नांगरभाट शिवकालीन पोखरबावचे रुपडे पालटणार

शिवप्रेमी, ग्रामस्थ श्रमदानातून करणार डागडुजी;१८ रोजी पहिला टप्पा

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील साळेल येथील मुख्य एसटी बसथांब्यानजीक असलेली पोखरबाव अर्थात शिवकालीन विहीर गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिली आहे. दयनीय अवस्थेत असलेला हा शिवकालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी श्रमदानाच्या माध्यमातून विडा उचलला आहे. प्राथमिक टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी श्रमदानातून विहिरीची डागडुजी व साफसफाई केली जाणार आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कमलाकर गावडे व सिंधुदुर्ग ऍडव्हेंचरचे डॉ. कमलेश चव्हाण यांनी दिली.

साळेल गावात पर्यटनाला वाव आहे. साळेल गावच्या परिसरात असलेल्या वास्तू शिवकाळ अधोरेखित करणारे आहेत. येथील घोडेबाव (पोखरबाव) ही रस्त्यालगत असूनही दुर्लक्षित राहिली. मात्र आता इतिहास तज्ज्ञांच्या ही शिवकालीन वास्तू प्रकाशझोतात आणली जाणार आहे. कुणकवळेतील बांधघाटी, साळेलमधील दोन घोडेबाव (विहिरी) तसेच साळकुंभा येथील घोडेबाव या वास्तू इतिहासकाराना खुणावत आहेत, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

शिवकालीन विहीर १५ ते २० वर्षे दुर्लक्षित राहिल्याने सद्यस्थितीत अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीमध्ये बारमाही पाणी असते, मात्र विहिरीच्या दगडांमधून उगवलेली मोठमोठी झाडे बांधकाम ढिसाळ करत आहेत. त्यामुळे हा शिवकालीन वारसा जतन करण्यासाठी शिवप्रेमीच्या वतीने कोकण ट्रेक अँड ट्रेल आणि सिंधुदुर्ग ऍडव्हेंचरने पुढाकार घेतला आहे. वाढलेली झाडी तोडून विहिरीची साफसफाई करण्यासाठी रविवार १८ सप्टेंबर रोजी श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकण इतिहास परिषद, मातृत्व आधार प्रतिष्ठान, शिवप्रेमी सिंधुदुर्ग, दुर्गवीर प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत, असे गावडे यांनी सांगितले.

साळेल गाव महाराष्ट्रच्या पर्यटन नकाशावर आणायचा आहे. याठिकाणची निवडक ठिकाणे टुरिझम हब म्हणून नावारूपाला आणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंद घेतली जाणार आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page