मालवण (प्रतिनिधी)
भाजपच्या भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे व सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शना नुसार सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण शहर मंडल अध्यक्ष पदी मालवण तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अशोक मोहिते यांची निवड करण्यात आली.
मालवण येथील भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष शांताराम गोसावी यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या मालवण कार्यकारणी बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड जाहीर करण्यात आली. अशोक मोहिते मालवण तालुका बेलादार भटका समाज संघटनेचे विद्यमान तालुका अध्यक्ष असून तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांचे निवडीने भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीला निश्चितपणाने ताकद मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना अशोक मोहिते म्हणाले, भाजप पक्षाला यांना अभिप्रेत असणारे काम आघाडीच्या माध्यमातून करू व आघाडीतील सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करु. समाजातील जातीचे दाखले, रस्ते कामे यांसारखे कामे अजून प्रलंबित आहेत त्याचा आपल्या आघाडीकडून पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, मालवण तालुका अध्यक्ष शांताराम गोसावी,जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सुनील वरक,राजू मानवर,अमित गोसावी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
