सामाजिक बांधिलकी जपत सर्वांना सहकार्य करणाऱ्या बांद्याच्या बाप्पाच्या मंडळाचे केले कौतुक
बांदा/प्रतिनिधी
भक्तांच्या हाकेला धावणारा येथील ‘बांद्याचा बाप्पा’ हा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळ, पूरपरिस्थिती, रक्तदान शिबिर तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांना मदत करणाऱ्या या मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा अर्चना फौंडेशनच्या संस्थापिका सौ. अर्चना घारे -परब यांनी येथे काढले.
येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याचा बाप्पा’चे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या रत्नागिरी जिल्हा पक्ष निरीक्षक सौ. दर्शना बाबर-देसाई, विनायक परब, वैभव परब आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी त्यांना बाप्पाचा प्रसाद दिला. यावेळी खजिनदार ओंकार नाडकर्णी, सर्वेश गोवेकर, दत्तप्रसाद पावसकर, संदेश पावसकर, राकेश केसरकर, बाबा काणेकर, निलेश कदम, आशुतोष भांगले आदी उपस्थित होते.
सौ. घारे-परब यांनी त्यानंतर उभाबाजार येथील हनुमान मंदिरातील सार्वजनिक गणपती व पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. हनुमान सेवक मंडळाचे ज्ञानेश्वर येडवे व पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी त्यांचे स्वागत केले. दोनीहीकडे त्यांनी श्रींच्या आरतीत सहभाग घेतला.
फोटो :-
बांद्याच्या बाप्पाचा प्रसाद सौ. अर्चना घारे-परब यांना देताना मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर. सोबत दर्शना बाबर देसाई, ओंकार नाडकर्णी व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
