अरविंद मोंडकर यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली मागणी
*💫मालवण दि.२८-:* ओझर-कांदळगाव-मसुरे खड्डेमय झाल्याने या रस्त्याचे काम पंधरा दिवसात पूर्ण करावे अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. हा रस्ता आंगणेवाडी जत्रेपूर्वी पूर्ववत करण्याचे आश्वासन मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याचे अरविंद मोंडकर यांनी सांगितले. ओझर-कांदळगाव-मसुरे बांदिवडे ते आडवली हा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत २५ फेब्रुवारी पर्यंत कार्यवाही नझाल्यास २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा माजी सभापती उदय परब यांनी दिला असताना या पार्श्वभूमीवर खड्डेमय झालेल्या ओझर-कांदळगाव-मसुरे या रस्त्याच्या प्रश्नाबाबत युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत महिंद्र सावंत, अनंत पवार हे उपस्थित होते. कांदळगाव-मसुरे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातही घडत आहेत त्यामुळे या रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसात होणे गरजेचे आहे. मसुरे गावातील आंगणेवाडी यात्रा असल्याने हा रस्ता तत्परतेने करण्यात यावा अशी मागणी अरविंद मोंडकर यांनी केली. याबाबत हा रस्ता आंगणेवाडी जत्रेपूर्वी पूर्ववत होईल असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले. अशी माहिती मोंडकर यांनी दिली आहे.
