Headlines

“गोव्यातील अपघातात सरमळेतील मंगेश गावडे यांचा दुर्दैवी मृत्यू”…

बांदा/प्रतिनिधी
शुक्रवारी रात्री गोवा पत्रादेवी नजीक दुसगी पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात सरमळे येथील मंगेश रघुनाथ गावडे (55) हे गंभीर जखमी होऊन निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने गावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असून त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच सरमळे गावावर शोककळा पसरली. नेहमी हसतमुख आणि मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाचा सर्वांनाच धक्का बसला.
मंगेश गावडे हे शुक्रवारी रात्री कामानिमित्त गोव्यात गेले होते. पत्रादेवी नजीक दुसगी पेट्रोल पंपाजवळ ते रस्ता क्रॉस करीत होते. नेमक्या याचवेळी गोव्यातून बांदा येथे मोटर सायकलने येत असलेल्या साहिल तारी यांच्या मोटरसायकलची अचानक रस्त्यावर आलेल्या मंगेश गावडे यांना जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले.
शनिवारी सकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सरमळे गावात त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी सरमळेवासियांनी त्यांच्या घरी धाव घेत गावडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. सखाराम गावडे यांचे ते भाऊ तर सरमळे सरपंच विजय गावडे यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.

You cannot copy content of this page