Headlines

बांद्यात १३ नोव्हेंबरला ‘दीपावली शो टाईम’; तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा पुन्हा बहरणार…

ब्युटी क्वीन, फॅन्सी ड्रेस आणि लाइव्ह स्टॅच्यू स्पर्धांची मेजवानी; युवा मंडळांचा पुढाकार..

⚡बांदा ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीतील मानबिंदू ठरलेल्या बांद्यातील ‘दीपावली शो टाईम’ या सांस्कृतिक महोत्सवाचे यंदा पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा शहरातील युवा मंडळाने यासाठी पुढाकार घेतला असून, विविध स्पर्धा, आकर्षक बक्षिसे आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे हा महोत्सव रंगतदार होणार आहे. येथील विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यात आली.
१९९१ मध्ये शहरात प्रथम ‘दीपावली शो टाईम’ची सुरुवात झाली होती. त्यानंतर सलग २० वर्षे हा सांस्कृतिक महोत्सव अखंडपणे सुरू होता. या महोत्सवाने बांद्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळीला चालना दिली. स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध कलाप्रकारांची ओळख सर्वदूर पोहोचविण्यात या उपक्रमाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विशेषतः ‘स्टॅच्यू’ अर्थात जिवंत मानवी पुतळ्यांची कला हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले होते. आता ही परंपरा पुन्हा सुरू होत असल्याने सांस्कृतिकप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
विविध स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे
महोत्सवात खुल्या गटासाठी ब्युटी क्वीन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि लाइव्ह स्टॅच्यू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा खुल्या असून या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह कोणत्याही राज्यातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
ब्युटी क्वीन स्पर्धा (खुला गट)
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक : २१,१११ रुपये, द्वितीय पारितोषिक : ११,१११ रुपये, तृतीय पारितोषिक : ५,५५५ रुपये असून याशिवाय ‘बेस्ट स्माईल’ आणि ‘बेस्ट कॅटवॉक’ ही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी संपर्क सिद्धेश शिरोडकर (मो. 9960393718)
फॅन्सी ड्रेस स्पर्धा (खुला गट)
प्रथम पारितोषिक : ११,१११ रुपये, द्वितीय पारितोषिक : ७,७७७ रुपये, तृतीय पारितोषिक : ४,४४४ रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक : १,१११ रुपये ठेवण्यात आले आहे. यासाठी विषय ऐछीक आहे. विविध वेशभूषा, कल्पक सादरीकरण आणि कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेमुळे सहभागी स्पर्धकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. नावनोंदणीसाठी संपर्क प्रथमेश गोवेकर (मो. 7720909014)
लाइव्ह स्टॅच्यू स्पर्धा
जिवंत मानवी पुतळ्यांची कला हे दीपावली शो टाईमचे ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. कलाकारांनी स्थिर राहून पुतळ्याप्रमाणे सादरीकरण करण्याच्या या आगळ्यावेगळ्या कलेला पुन्हा व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच नव्या कलाकारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. नामांकित कराओके गायक (निमंत्रित) रसिकांचे मामोरंजन करणार आहेत.
खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल
सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेताना खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी महोत्सवस्थळी फूड स्टॉल्सची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे स्पर्धक आणि प्रेक्षकांना एकाच ठिकाणी मनोरंजनासोबत खाद्यपदार्थांचाही आनंद घेता येणार आहे. यासाठी एकूण 20 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आयोजनासाठी युवा मंडळाचा पुढाकार
महोत्सवाच्या आयोजनात अध्यक्ष चेतन मुंगी, उपाध्यक्ष अर्णव स्वार, खजिनदार सिद्धेश शिरोडकर, सचिव साईराज साळगावकर, आशिष शिरसाट, सदस्य प्रथमेश गोवेकर, वल्लभ पडते, मयुरेश महाजन, साईप्रसाद रितिश नाटेकर,साहिल कल्याणकर आदी उपस्थित होते.
दीपावली शो टाईमच्या माध्यमातून बांद्याची सांस्कृतिक ओळख पुन्हा अधोरेखित करण्याचा आणि नव्या पिढीला कलाक्षेत्राकडे आकर्षित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी चेतन मुंगी (मो. 9860811593), साईराज साळगावकर (मो. 9860597065) किंवा अर्णव स्वार (मो. 9075729966) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page