‘फिट इंडिया’ मंत्रातून योगाचा प्रसार; भाजप नेते विशाल परब यांचा संकल्प ..

⚡सावंतवाडी ता.२५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात योगाचा प्रसार करून निरोगी समाजनिर्मितीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच विविध ठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भाजप नेते विशाल परब यांनी सांगितले. सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये फिटनेस योग फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित योग प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थींना विशाल परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळते. त्यामुळे योग हा केवळ व्यायामाचा प्रकार न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला पाहिजे. ग्रामीण तसेच शहरी भागात योगाविषयी जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना योगाभ्यासाकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्थानिक पातळीवर योगा सेंटर सुरू करून नागरिकांना नियमित योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. यावेळी योग प्रशिक्षक शेखर बांदेकर, संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, निशिगंधा सावंत, रेवती सावंत तसेच योग प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.”
