Headlines

सिंधूगणेश’ ब्रँड राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न; पहिल्या ४० मूर्तीकारांना प्राधान्य, प्रदर्शनासाठी नोंदणी विनामूल्य

मालवण (प्रतिनिधी) :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध कलापरंपरेतील गणेशमूर्ती कलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मालवणात १० नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जय गणेश मूर्तिकार कारागीर सहकारी संस्था मर्यादित, मालवण यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनातून जिल्ह्यातील हाताने गणेशमूर्ती घडविणाऱ्या कलाकारांची कला राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी श्री देवरामेश्वर नारायण यांच्या पालखी परिक्रमा प्रदक्षिणा सोहळ्याच्या निमित्ताने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

कोकणातील गणेशमूर्ती कलेला मोठी परंपरा आहे. या परंपरेतून अनेक नामवंत मूर्तिकार घडले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गावागावांत नवे कलाकार तयार झाले आहेत. मात्र, अनेक कुशल मूर्तिकारांना त्यांच्या कलेनुसार प्रसिद्धी आणि व्यावसायिक संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा कलाकारांची कलाकृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या कामाला योग्य व्यावसायिक दिशा मिळावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत व्हावी, हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे.

सिंधुदुर्गातील गणेशमूर्ती कलेची स्वतंत्र ओळख निर्माण करून ‘सिंधूगणेश’ हा ब्रँड राज्यभर पोहोचविण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील गणेशमूर्ती व्यावसायिकांना प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. विशेषतः कच्च्या गणेशमूर्ती खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना या प्रदर्शनात सहभागी करून जिल्ह्यातील मूर्तिकारांसाठी नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

केवळ सिंधुदुर्गातील हाताने घडविलेल्या मूर्तींनाच संधी
या प्रदर्शनासाठी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकारांना सहभागी होता येणार आहे. मूर्ती पूर्णपणे हाताने घडविलेली असणे आवश्यक असून, डोक्यापासून पायापर्यंत मूर्ती तयार करताना साच्याचा वापर केलेला नसावा. मूर्ती मातीची, दोन फुटांपेक्षा कमी उंचीची आणि रंग न दिलेल्या कच्च्या स्वरूपातील असावी.

मूर्तीच्या मागील बाजूस मूर्तिकाराचे नाव, संपर्क क्रमांक आणि ‘सिंधूगणेश’ असा उल्लेख कोरलेला असणे आवश्यक आहे. तसेच प्रदर्शनाच्या दिवशी मूर्तीच्या मातीत थोडा ओलावा शिल्लक राहील, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदर्शनासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० मूर्तीकारांच्या कलाकृतींना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक मूर्तिकारांनी ९४२२४३४३८० या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी. प्रदर्शनासंबंधीच्या अटी व शर्ती नोंदणीनंतर व्हॉट्सॲपद्वारे कळविण्यात येणार आहेत.

हे प्रदर्शन स्पर्धा नसून मूर्तिकारांच्या कलेला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदर्शनात कोणतेही क्रमांक किंवा पारितोषिकांसाठी क्रमवारी काढली जाणार नाही. प्रदर्शनासाठी दिलेली मूर्ती प्रदर्शनानंतर संस्थेकडेच जमा राहील; ती संबंधित मूर्तिकाराला परत दिली जाणार नाही.

सिंधुदुर्गातील पारंपरिक गणेशमूर्ती कलेला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक हाताने मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जय गणेश मूर्तिकार कारागीर सहकारी संस्था मर्यादित, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page