विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान:शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा..

⚡कणकवली ता.२४-: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, अखिल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनील लक्ष्मण ठाकूर (वय ५७) यांचे शनिवारी दारिस्ते येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिक्षण क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या एका आदर्श शिक्षकाच्या निधनाने तालुक्याने कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुनील ठाकूर यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला विशेष महत्त्व दिले. ‘विद्यार्थी हाच जीवनाचा खरा गाभा’ ही भूमिका जपत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज देश – विदेशात तसेच विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि स्पर्धेच्या युगात त्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करावे, यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. शाळेला डिजिटल स्वरूप देणे, आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर वाढविणे तसेच विविध स्पर्धांमधून शाळेचा नावलौकिक उंचावणे, यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अध्यापनातील निष्ठा, विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता आणि शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. शैक्षणिक जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक क्षेत्राशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. माध्यमिक विद्यालय नाटळ माजी विद्यार्थी संघाचे सक्रिय पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते. या माध्यमातून त्यांनी माजी विद्यार्थ्यांशी असलेले नाते जपले होते.
सुनील ठाकूर यांच्या निधनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा, सहकाऱ्यांना सहकार्य करणारा आणि समाजाशी आपुलकीचे नाते जपणारा शिक्षक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला शिक्षक बांधवांसह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना असलेले आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सुनील ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांचे साधे, प्रेमळ व्यक्तिमत्त्व यामुळे ते सदैव स्मरणात राहतील.
