कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आवाहन
⚡कणकवली ता.०७-: विविध शासकीय योजना, पिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतीचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी नोंद असणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप डाऊनलोड करून त्या माध्यमातून ही पीक पाहणीची नोंद करावी. शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास मंडळ अधिकारी, तलाठी तसेच आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.
प्रत्येक शेतकऱ्याने या ॲपच्या माध्यमातून पीक पाहणनीची नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी ॲप डाऊनलोड केल्यावर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपणाला माहिती भरता येते. सुधारित ॲप मध्ये गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेषाश समाविष्ट करण्यात आलेले आहेत. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी नोंद करताना फोटो घेतील त्यावेळी त्या गटाच्या मध्यबिंदूचे अंतर अज्ञावली मध्ये दिसणार आहे. शेतकरी ई पीक पाहणी साठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲप मध्ये दर्शविण्यात येणार आहे. नोंदविलेली माहिती चुकीची असल्यास 48 तासात त्या दुरुस्ती ही करता येते. किमान आधारभूत योजनेअंतर्गत येणाऱ्या पिकांची पीक पाहणी साठी नोंद करणे आवश्यक आहे . ॲप मध्ये नोंद करताना शेतकऱ्यांना आपणास किमान आधारभूत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे का असा प्रश्न विचारला जाणार असून त्यावेळी होय म्हणून माहिती भरावयाची आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावली द्वारे पुरवठा विभागाला देण्यात येणार असून पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे.
या ॲपमध्ये मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधाही आहे. ॲप मधून माहिती भरताना अत्यंत सोप्या पद्धतीने ही माहिती भरता येते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंद करून घ्यावी असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे. गाव पातळीवर तलाठी, तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे. त्याचप्रमाणे काही समस्या असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असेही श्री. पवार यांनी म्हटले आहे.
