⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: तालुक्यात काल बुधवारी घरोघरी लाडक्या गणपतीचे थाटामाटात आगमन झाले. गावागावात पुरोहितांच्या सहाय्याने घरोघरी गणपतीचे भक्तीभावाने पूजन करण्यात आले.
गणेश चतुर्थी हा कोकणातील महत्वाचा सण आहे. त्यामुळे लाडक्या गणेशाचे सकाळी लवकरात लवकर पूजन करता यावे, या उद्देशाने काही ठिकाणी मंगळवारीच गणेश शाळांमधून गणेश मूर्ती घरी नेण्यात आल्या तर काही ठिकाणी बुधवारी सकाळपासून गणेश मूर्ती घरी नेण्यात आल्या. पुरोहितांनी सकाळी लवकर आपल्या गणपतीचे पूजन करून इतर गणपती पूजनासाठी पहाटेपासूनच आपल्या कामास सुरुवात केली. पुरोहित कमी पडू नये म्हणून बाहेरूनही पुरोहित मागविण्यात आले. पुरोहितांच्या उपस्थितीत घरोघरी गणेशाचे मनोभावे पूजन करण्यात आले.
त्यानंतर दुपारनंतर टाळ मृदूंगाच्या नादात सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीचे स्वर सर्वत्र घुमू लागले. सर्वत्र मोरया रे बाप्पा मोरया रे च्या नादाने परिसर गणपतीमय होऊन गेला. गणेशोत्सव दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा साजरा होणार आहे.
