दत्ता सामंत यांचे निलेश राणे यांना निवेदन
मालवण : (प्रतिनिधी)
वॉटरस्पोर्ट्स व्यवसायास अनुकूल असणारे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारे देवबाग गावातील सुनामी आयलंड पुनर्जीवित करण्यासाठी देवबाग संगम परिसरातील कर्ली खाडीपात्रातील गाळ उपसा करून तो सुनामी आयलंडवर टाकण्यात यावा, यासाठी सक्शन ड्रेझर मशीन शासन स्तरावरून उपल्बध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दत्ता सामंत यांच्या वतीने भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन दत्ता सामंत यांनी निलेश राणे यांना सादर केले. यावेळी मंदार लुडबे व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण देवबाग गावात पर्यटनाच्या दृष्टीने जलक्रिडा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असून स्थानिक पर्यटन व्यावसायीक आपला उदरनिर्वाह या व्यवसायावर करतात. देवबाग कर्ली खाडीत असलेल्या सुनामी आयलंड याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलक्रीडा होतात. मात्र, यंदा समुद्राच्या उलट प्रवाहामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आहे. समुद्राचा भू-भाग प्रमाणापेक्षा वाहून गेला आहे. त्यामुळे खाडीतील गाळ जर देवबाग संगमावरील बेटावर टाकला तर पर्यटन व्यवसायीकांना भरपूर फायदा होईल. तारकर्ली खाडीत असणारा ड्रेजर जर देवबाग खाडीत गाळ उपसा करण्याकरीता दिला तर देवबाग संगम आणि सुनामी आयलंड मोठ्या प्रमाणात विकसीत होईल आणि पर्यटन व्यवसायिक आणि पर्यटक सुरक्षित राहतील. तरी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन तारकर्ली बंदरातील ड्रेजर देवबाग खाडीत उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी दत्ता सामंत यांनी निवेदनातून केली आहे.
