आजगाव नंबर १ प्रशालेचा ‘शतकोत्तर महोत्सव’ दिमाखात साजरा होणार,

माजी विद्यार्थी संघाचा निर्धार

⚡सावंतवाडी ता.२५- : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी सर्वच भारतीयांनी दिमाखात साजरा केला. जसा देश आपल्याला वंदनीय आहे तशीच प्रत्येकाला आपली प्राथमिक शाळा देखील वंदनीय असते. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे सन १८७१ मध्ये स्थापना झालेल्या प्राथमिक शाळा आजगाव नं.१ यावर्षी डिसेंबर महिन्यात आपला शतकोत्तर महोत्सव साजरा करत आहे.

आजगाव प्राथमिक शाळेला तब्बल १५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचा सार्थ अभिमान या प्रशालेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या व आता शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना आहे. या प्रशालेने पारतंत्र्याच्या काळात ७५ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेले आहे. या प्रशाळेने हजारो विद्यार्थी घडविले असून आज ते विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा ज्ञानदानाची पवित्र परंपरा लाभलेल्या या शाळेचा शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. शतकोत्तर महोत्सवासाठी माजी विद्यार्थी संघ विविध कार्यक्रमांसाठी एकवटला असून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा प्रभू-झांट्ये, उपाध्यक्ष सूर्यकांत आडारकर, सचिव विलासानंद मठकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर व कार्यकारिणीतील सर्व सदस्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सज्ज झाले आहेत. शतकोत्तर महोत्सवाच्या नियोजनासाठी येत्या ५ सप्टेंबरला ( गणपती उत्सवाच्या सहाव्या दिवशी ) आजगाव मराठी शाळा सभागृहात सकाळी ठीक १० वाजता माजी विद्यार्थी संघाने महत्वपूर्ण सभा आयोजित केलेली आहे. या सभेत शतकोत्तर कार्यक्रमाचे नियोजन करुन, विविध समित्या गठीत करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात येईल. या सभेस बहुसंख्येने माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे अध्यक्ष आवाहन रामचंद्र उर्फ अण्णा प्रभू-झांट्ये यांनी केले आहे.

You cannot copy content of this page