⚡सावंतवाडी ता.२५-: भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात भात महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी, मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर या भागात प्रामुख्याने भात पिक घेतले जाते. भाताची उत्पादकता २.०१ टन प्रती हेक्टरी आहे.
या पिकांवर येणाऱ्या मोठ्या प्रमाणात किडी व रोगांपासून बचाव व्हावा, म्हणून खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम राबविण्यात येत आहे.
कीड व रोग व्यवस्था करण्यासाठी पीक संरक्षण उपाय म्हणून उपलब्ध असल्या तरी त्यासाठी वेळीच उपयोजना करणे गरजेचे आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली तसेच कृषी विद्यापीठे यांचे समन्वयाने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉप्स २०१०-२०११ पासून राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्या संकल्पनेतून शेती व शेतकऱ्यांना नवचैतन्य देण्यासाठी राज्यात विविध मोहिमा राबवल्या जातात.
यावर्षी खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर बीज प्रक्रिया मोहीम आणि कृषी संजीवनी मोहिमेच्या यशस्वी आयोजनानुसार राज्यात १७ ते ३० ऑगस्टपासून खरीप पिक उत्पादन वाढ ही मोहीम प्रारंभ करण्यात आली. सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर केसरी या गावामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी भात, नागली या पिकांना नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांवर लोह, मॅगेनीज, बोराॅन, जस्त, कॉपर यांची गरज असते, असे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक संदीप देसाई यांनी भात पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी जैविक व सेंद्रिय कीटकनाश यांचा वापर करायचे आवाहन केले. तसेच भातावर पडणाऱ्या किडी व रोगांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर जमीन व पाणी यांच्यापासूनचे प्रदूषण रोखणे, व नत्राचा जो अपव्य होत आहे तो टाळण्यासाठी, नॅनो युरियाचा वापर करावा, तसेच विविध नैसर्गिक पद्धतीने पिकांचे संरक्षण करण्यासाठी पक्षी थांबे उभारणे, लाईट ट्रॅप यांसारख्या उपाययोजना कराव्या, असे आवाहन केले.
तसेच रोपवाटिकेमध्ये मका व तुळस यांची जर लागवड आजूबाजूला केली तर मित्र घटकांचे चांगले संरक्षण होते आणि त्यापासून आपल्या मुख्य पिकावर परिणाम कमी प्रमाणात होतात. तसेच पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकटसापळ्यांचा पण वापर करावा, असे आवाहन कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी केले.
सदर कार्यक्रम आणि मोहीम यासाठी जिल्ह्याचे कृषी अधिकारी श्री. दिवेकर तसेच कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री देवेंद्र फौजी, सावंत, उपसरपंच भरत जनार्दन गोरे, तसेच ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी महिला गट तसेच केसरी गावातील प्रगतीशील शेतकरी अनिल परशुराम सावंत व प्रसाद नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे स्वागत कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी केले.
