मयत पेशंटला कर्नाटकला नेताना रोखले, संबंधितांची संशयास्पद हालचाल
⚡सावंतवाडी ता.२५- : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या चोऱ्या, घरफोडयांच्या अनुषंगाने वाहनाची तपासणी करीत असताना रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान कर्नाटक पासिंगची चार चाकी परमिटची गाडी क्रमांक के. ए. ०३ ए.जी. ९४२६ या गाडीचे चालक परशुराम भिमाप्पा तलवार (वय वर्ष ३६) आणि इतर चार जण हे बांदा येथून कर्नाटककडे जात असताना सातोळी तिठा येथे तपासणी करिता त्यांची सदर कार थांबवली असता गाडीच्या आतमध्ये मानतेस चंद्रप्पा कुमारी (वय ३८ वर्षे, राहणार बेळगाव, तालुका बैल होंगल) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत दिसला. म्हणून पोलिसांनी सदर ड्रायव्हरकडे चौकशी केली असता, त्याने तो तरुण आजारी असून बांदा येथून बेळगाव येथे घेऊन जात आहोत, असे सांगितले.मात्र पोलिसांनी त्यांना “तुम्ही पहिल्यांदा दवाखान्यात पेशंटला घेऊन चला, असे सांगून त्यांच्या सोबतच पोलीस हवालदार प्रवीण सापळे व विलास नर यांना वरील पेशंटसोबत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचाराकरिता आणले. मात्र बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मानतेस चंद्रप्पा कुमारी यांना दवाखान्यात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांनी सदर इसम मयत झालेबाबत सांगितले.
दरम्यान, सदरची हकीकत सावंतवाडी पोलीस स्टेशनला व नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग यांना कळविण्यात आलेली आहे, असे पोलिसांनी कळविले.
सहाय्यक पोलीस फौजदार अजित घाडी, पोलीस हवालदार प्रवीण सापळे, विलास नर , प्रशांत आरोलकर, पोलीस नाईक मयूर सावंत आदी होते.
