तीन तोळ्यांच्या मंगळसूत्रासह नथ असा दोन लाखांचा ऐवज चोरीस; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल…
सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात एकीकडे चोरी व घरफोडी असे प्रकार वाढलेले असतानाच आता चक्क बस स्थानकातही प्रवाशांना लुटण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ठाणे येथून कलबिस्त येथे जाण्यासाठी आलेल्या एका महीलेला सावंतवाडी बसस्थानकावर अज्ञाताने लुटले. तिच्या पर्समध्ये असलेले तीन तोळ्याचे मंगळसुत्र आणि नथ असा सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. सुवर्णा वासुदेव तावडे रा कलबिस्त घनशेळवाडी ( ६५ ) असे तीचे नाव आहे. दरम्यान याबाबत तीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहीती अशी की, सदरची महीला ही गणेश चतुर्थी सणासाठी ठाणे येथुन आपल्या पतीसह जनशताब्दी रेल्वे मधून आली होती. मळगावस्थित सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन मध्ये उतरल्यानंतर त्या सावंतवाडीत आल्या त्यानंतर कलबिस्त मध्ये जाण्यासाठी सावंतवाडी-शिरशिंगे बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्स मधील दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. मात्र त्या घरी गेल्यानंतर हा प्रकार त्याला लक्षात आला. ही घटना काल चार वाजण्याच्या सुमारास घडली.
त्यानंतर तात्काळ त्यांच्या मुलाने काल याबाबतची कल्पना सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती.सौ तावडे यांनी आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दिली त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करित आहे.
