देवाच्या इच्छेप्रमाणे मी पदावर जाईन…

माजी खा. निलेश राणे; जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातुन मी आमदार व्हावे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. मात्र मी कोणत्या पदावर जावे ही देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल. राणे कुटूंबाला सर्वांसोबत राहायला आवडत असल्याने जनता हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी मालवण घुमडे येथे बोलताना केले

दत्ता सामंत यांच्या वतीने घुमडाई मंदिर येथे आयोजित भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी डॉ निलेश राणे व दत्ता सामंत यांची दिलखुलास भाषणे झाली.

यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या भजन स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. सामंत यांचे कार्य व कार्यक्रम कधीच फायद्यासाठी नसतात तर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी असतात. तसेच त्यांचे कार्यक्रम आयोजन वेगळ्या उंचीचे व दर्जेदार असतात. ही भजन स्पर्धाही यशस्वी झाल्याचे सांगून डॉ निलेश राणे म्हणाले , लोकांसाठी, समाजासाठी काम करत राहायचे. याच भावनेतून काम करत असताना पक्षाचे आदेश व देवाच्या इच्छेने आमदार झालो तर माझ्या नंतर दत्ता सामंत यांनाही त्याच सन्मानाने विधिमंडळात नेणे हेच माझे प्रयत्न राहतील विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत. त्यांच्यात दुरावा असणार नाही. असे निलेश राणे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी माझे आणि निलेश राणे यांचे शत्रुत्व आहे. असे चित्र निर्माण केले जाते. अश्या अफवा उठवल्या जातात. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विजयाचे सारथ्यच मीच करणार हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. निलेश राणे हे पितृप्रेम असणारे भावनिक नेतृत्व आहे. निलेश राणे यांच्या सारखा दानशूर आणि दिलदार व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नाही. हे वास्तव आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार. २०२४ ला निलेश राणे आमदार होणारच. आगामी काळात निलेश राणे आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणूनच काम करणार असे श्री सामंत यांनी स्पष्ट केले.

श्री सामंत पुढे म्हणाले, मधल्या काळात मी शिवसेनेत प्रवेश करणार अश्या अफवा उठवल्या गेल्या. मात्र खरी वस्तुस्थिती खासदार विनायक राऊत यांचे पी ए नागेंद्र परब व अन्य काही मंडळी माझ्या घरी आले. राणे साहेबांच्या विरोधात वक्तव्य केली. विष कालवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा मी त्यांना तिथून जाण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट करून दत्ता सामंत यांनी निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आगामी काळात मालवण कुडाळ तालुक्यात विभागवार दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page