मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आवाहन
⚡मालवण ता.२४-:
गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मालवण शहरात गणेशोत्सव सुरळीत संपन्न व्हावा यादृष्टीने मालवण नगरपालिकेने नियोजन केले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्ट्रीट लाईट दुरुस्ती, गणेश विसर्जन स्थळांची डागडुजी, निर्माल्य कलश व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदी कामांबाबत नागरपालिकेने नियोजन करून सदर कामे करण्याबाबत संबंधित विभाग, कर्मचारी व ठेकेदार यांना सूचना दिल्या आहेत अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देत गणेशोत्सव कालावधीत मालवण शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, रिक्षा व्यावसायिक यांनी नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
मालवण शहरातील बहुतांश रस्ते एप्रिल मे महिन्यात डांबरीकरण करुन घेण्यात आलेले असून उर्वरित रस्ते सुस्थितीत ठेवणेसाठी नगरपरिषद वार्षिक दुरुस्ती ठेकेदारास कामाचे आदेश दिलेले असून दि. २३ ऑगस्ट पासून काही रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु केलेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी/ गवत कापण्यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत १ ऑगस्ट पासून कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. तसेच शहरात डास प्रतिबंधक फवारणी नगरपरिषद आरोग्य विभाग कर्मचारी यांचेमार्फत दि. १९ ऑगस्ट पासून सुरु आहे.
मालवण शहरातील स्ट्रीट लाईट विद्युत व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रमुख ठिकाणांवरील हायमास्ट दुरुस्तीसाठीचे कार्यारंभ आदेश विद्यूत ठेकेदारास देण्यात आलेले असून दि. २३ ऑगस्ट पासून दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुस्थितीत व सुरु ठेवण्यासाठी शासन नियुक्त EESL या कंपनीला पुरेसे विद्यूत दिवे पुरविण्याची सुचना देण्यात आलेली असून कंपनीकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याची खातरजमा करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीकडून विदयुत पुरवठा अखंडीत ठेवण्याबाबत संबंधित विभागाचे अभियंता यांचेसोबत समन्वय ठेवण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली आहे.
गणपती विसर्जन स्थळांवरील गाळ काढणे, पायऱ्या दुरुस्त करणे यासाठी वार्षिक दुरुस्ती कंत्राटदारास कामाचे आदेश देण्यात आलेले असुन गणेशमुर्ती विसर्जन योग्यरितीने व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. गणेश चतुर्थी कालावधीत म्हणजेच दि. ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत शहरातील वाहतूक नियोजन योग्यरितीने करता यावे याकरिता दरवर्षीप्रमाणे वाहतूक नियोजन फलक लावण्याचे आदेश कंत्राटदारास देण्यात आलेले असून त्यानुसार दि. २९ ऑगस्ट रोजी पोलीस विभागाच्या मार्गदर्शनानुसार फलक व आवश्यक तेथे बॅरिकेटस उभारण्यात येणार आहेत. शहरात एकूण २२ गणेश विसर्जन स्थळे असून या विसर्जन स्थळांवर गणेशमुर्ती विसर्जनासाठी आवश्यक विद्युत व्यवस्था करण्याबाबतचे आदेश विदयुत ठेकेदारास देण्यात आलेले असून त्यांचेकडून चतुर्थीच्या दहा दिवस विसर्जनस्थळी हॅलोजन लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य ठेऊन समुद्र परिसर आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे, असे श्री. जिरगे यांनी म्हटले आहे.
गणेश चतुर्थी कालावधीत कोणत्याही राजकीय पक्ष, कार्यकर्ते, नागरिक यांनी अनधिकृत फलक / बॅनर लावून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करु नये असे आवाहन नगरपरिषदतर्फे करण्यात येत आहे. असे अनधिकृत विनापरवाना / वाहतुकीस अडथळा येणारे अथवा विद्रूपीकरण करणारे फलक लावलेले दिसल्यास ते तात्काळ काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. फलक / बॅनर लावण्यासाठी रितसर परवानगी देणेची प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली असून एकाच टेबलवर परवानगी देण्याची तरतुद करण्यात आलेली असून अशा परवानगीसाठी नगरपरिषद कर विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषदतर्फे करण्यात येत आहे, असेही श्री. जिरगे यांनी म्हटले आहे.
नगरपरिषदेकडे अद्यावत अग्निशमन वाहन उपलब्ध आहे. कोणतीही आगीची घटना घडल्यास नगरपरिषदेच्या टोल फ्री नंबर 18002334381 व कार्यालयीन फोन नंबर 02365-252030 वाहन चालक श्री. रुपेश हडकर 9404445522 श्री. शिर्सेकर 9404917758 यांच्याशी संपर्क करावा. तसेच तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील दि. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या गणेश चतुर्थी नियोजन बैठकीत प्राप्त सूचनानुसार सोमवार दि. ५ सप्टेंबर रोजीचा आठवडा बाजारा सागरी महामार्ग या ठिकाणा ऐवजी सोमवारपेठ व बंदर जेटी परिसर येथे भरविण्यात यावा. सागरी महामार्ग येथे बसणाऱ्या विक्रेत्यांना दुपारी १२ वाजेपर्यंतच आपले दुकान बंद करावे लागेल, अशा सूचनाही श्री. जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिल्या आहेत.
