शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ

ओरोस ता.२२-:

जुनी पेन्शन व शिक्षकांच्या अन्य न्याय्य मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीमेचा सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शुभारंभ करण्यात आला आहे.
सन २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.,
शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित शिक्षकांची नेमणूक करा., नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी काढून टाका., सातव्या वेतन आयोगाच्या सर्व तरतुदी लागू करा तसेच खंड दोन प्रकाशित करा., शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करा या प्रमुख मागण्या मान्य करून घेण्यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहिमेची हाक दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गचे वतीने ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे २० ऑगस्ट २०२२ रोजी राज्य, जिल्हा व तालुका पदाधीकाऱ्यांच्या प्रातीनिधिक स्वरूपात सहया घेऊन उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा सरचिटणीस श्री बाबाजी झेंडे यांनी सर्वाचे स्वागत करून राष्ट्रव्यापी आंदोलनाची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेद्वारे करून ५ सप्टेंबर शिक्षकदिनी महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना हजारो सहयांचे निवेदन दिले जाणार आहे असे सांगितले .जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी सांगितले. जिल्हयातील प्रत्येक शिक्षक बांधवांनी आपल्या शिक्षक बांधवांसाठी स्वाक्षरी मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. राज्य संघटक प्रशांत पारकर यांनी जिल्ह्यात ही स्वाक्षरी मोहिम व सप्टेंबर मधील धरणे आंदोलन कशाप्रकारे राबविण्यात येईल याची माहिती देत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. या वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य व सर्व तालुकाध्यक्ष सचिव व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page