पर्यावरण प्रेमी रमेश गावस यांचे दोडामार्ग येथे आवाहन
ओरोस ता.२२-:
केवळ मतदार म्हणून जगू नका. घटनेने दिलेले नागरिकत्वाचे हक्क वापरून स्वतःच्या अस्तित्वासाठी ‘इकोसेन्सिटिव्ह’चा लढा द्या. आज झोपून राहाल तर कायमचे नष्ट व्हाल, असा इशारा साखळी (गोवा) येथील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी रमेश गांवस यांनी दोडामार्ग येथे दिला.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसुचनेतुन दोडामार्ग तालुका संपूर्ण वगळला आहे. त्याचा समावेश करावा, या मागणीसाठी ‘घुंगुरकाठी सिंधुदुर्ग’ संस्थेने ‘वनश्री फाउंडेशन’ आणि पर्यावरणप्रेमींच्यावतीने सहकार्याने दोडामार्ग बाजारपेठेत जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी श्री. गांवस बोलत होते. यावेळी ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, ‘वनश्री’चे अध्यक्ष संजय सावंत, ॲड. सोनु गवस, ॲड. निलांगी रांगणेकर सावंत, ॲड. उमा सावंत, ॲड. प्रवीण नाईक, उदय पास्ते, सतीश गवस, चंद्रशेखर सावंत, संदेश देसाई, दीपक गवस, नंदकुमार गावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
