व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक ः अजून नेमके किती दिवस लागणार?
⚡बांदा ता.२२-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 थर लावून राजकीय मोठी हंडी फोडली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सर्वसामान्य नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची हंडी किती दिवसांचे थर लावून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात फोडणार असा सवाल, पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी शासनास केला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अनेक दिवसांचा कालावधी उलटला. नवीन मंत्री जिल्ह्यात फिरून गेले मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून आले. शासन निर्णय झाला तरी प्रत्यक्षात मात्र लाभार्थी शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे.
महाविकास आघाडी सरकार व नवीन स्थापन झालेले सेना-भाजप युतीच्या सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा मानस दाखविला व तसा शासन निर्णयही झाला. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांप्रती दिलासा दाखवला. ठाकरे सरकारच्या काही निर्णयांना सध्याच्या सरकारने स्थगिती आणली परंतु शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदान निर्णयास मात्र मान्यता दिली. त्यामुळे सरकारने जास्त उशीर न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष देत गणेशोत्सवापूर्वी प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करावे, अशी मागणी पाडलोस व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी शासनाकडे केली आहे.
