रास्त धान्य गणेशोत्सव पूर्वी उपलब्ध करा

अन्यथा आंदोलन करणार;सावंतवाडी मनसेचे तहसीलदार यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.२२-: तालुक्यातील रेशन धान्य दुकानामध्ये सध्या शासकीय धान्य वेळेत उपलब्ध होत नाही. शासकीय धान्य मागणीबाबत वेळेत चलन पाठवून देखील रास्त धान्य दुकानामध्ये विलंबाने पोहचत आहे. परिणामी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे त्यामुळे सर्व रेशन धान्य दुकानामध्ये वेळेत धान्य उपलब्ध करून दिले जावे अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की सावंतवाडी तालुक्यातील 59 शासकीय रेशन धान्य दुकानामध्ये महिन्याच्या शेवटी धान्य उपलब्ध होते. ते वितरित करण्यासाठी पुढे दुकानदारना बरीच कसरत करावी लागते. शासकीय धान्य मागणी बाबतचे चलन डिओ हे पुणे येथून मजूर होत असून त्यासाठी तालुका पुरवठा विभागाने पंधरा दिवस अगोदरच शासकीय धान्य मिळण्यासाठी डीओ पाठवायची आहे. तालुक्यातील सर्व शासकीय धान्य दुकानदारांचे धान्य मागणीबाबतचे चलन पुरवठा विभागाकडे वेळेत पोहचते. मात्र पुरवठा विभागाकडून ती डीओ वेळेत पाठवली जात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. परिणामी धान्यची मागणी उशिरा केल्याने पुढे धान्य वितरणास विलंब होतो याची नोंद घ्यावी.

दरम्यान शासकीय धान्य गोदामात आले तरी त्याचे वाटप करण्यासाठी असणारी वाहतूक यंत्रणा देखील सक्षम नाही. तालुक्यातील रास्त धान्य दुकानदाराना पुरवठा करण्यासाठी असलेल्या ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरु असून दोन गाड्या फक्त वितरण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. या ठेकेदाराने नियमांनुसार सात गाड्या वापरणे आवश्यक असून त्यामुळे देखील धान्य वेळेत पोहचण्यात विलंब होत आहे. परिणामी धान्य वितरणासाठी खाजगी ठेकेदार मार्फत गाड्या न घेता एस टी बस ची मालवाहतूक सुविधा घेण्यात यावी. सध्या सर्वच रास्त धान्य दुकानामध्ये पॉस मशीन मध्ये तांत्रिक बिघाड सुरूच आहे. बहुतांशी ठिकाणी सर्वर डाऊन असल्याने नागरिकांना रेशन धान्य वेळेत मिळत नाही याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

यावेळी मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार माजी कार्याध्यक्ष संतोष भैरवकर सचिव कौस्तुभ नाईक प्रवीण गवस प्रसाद मिशाळ मनोज कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page