तर अलिबाग येथील मोहन घरत उपविजेता…
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील सतीश आचरेकर मित्रमंडळ यांच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित भव्य पारितोषिक रकमेच्या नारळ लढविणे स्पर्धेत मुंबई येथील भावेश पाटील विजेते तर अलिबाग येथील मोहन घरत उपविजेते ठरले. असिफ कुरेशी (मुंबई) आणि सतीश आचरेकर (मालवण) यांना तृतीय व चतुर्थ क्रमांकाने गौरवण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, उपविजेता २५ हजार, तृतीय क्रमांक १० हजार, चतुर्थ क्रमांक ५ हजार व मानाचे चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अत्यंत मानाच्या व भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चार गटांमध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा येथील ३२ मातब्बर संघ सहभागी झाले होते. मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुल्या गटात भव्य दिव्य स्वरूपात व सर्वात मोठ्या रक्कमेची मानाची स्पर्धा म्ह्णून या स्पर्धेची ओळख असल्याने स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी होती..
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सागर तिगाडी (मुंबई), निलेश वेरणेकर (गोवा), राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, जिल्हा सचिव प्रमोद कांडरकर, आगोस्तीन डीसोजा, आंनद आचरेकर, राज जाधव, वैभव मयेकर यासह अन्य सहकारी उपस्थित होते.
स्पर्धेला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यासह अन्य पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रत्नागिरी येथील उद्योजक अजिंक्य भोंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
