जलक्रीडा, पर्यटन व्यावसायिकांच्या महासंघाची स्थापना होणार

१५ ऑगस्टला होणार घोषणा
बैठकीत निर्णय

मालवण (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील वॉटर स्पोर्टस्, स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांना एकत्र करून जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यावसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांनी प्रसिद्धीपत्रातून दिली आहे.

मालवणसह जिल्ह्याच्या सागरी व खाडी किनारपट्टीवर जलक्रीडा व पर्यटन व्यावसायिक यांनी मोठ्या मेहनतीने पर्यटन व्यवसाय उभे केले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीत या सर्व व्यावसायिकांचे महत्वाचे योगदान आहे. मात्र, शासन स्तरावरील प्रश्न असो अथवा अन्य समस्या नेहमीच या व्यावसायिकांना संघर्ष करावा लागला. तरी पर्यटन व्यावसायिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची स्वत:ची हक्काची संघटना असावी, या हेतूने जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यावसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अनेक पर्यटन व्यावसायिकांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. जलक्रीडा व पर्यटन व्यावसायिकांच्या एकत्र बैठका तसेच भेटीगाठी घेऊन एकमताने महासंघाची कार्यकारिणी निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती तोडणकर यांनी दिली आहे.

पर्यटन व्यवसायात टूर्स व्यावसायिकांचे महत्वाचे स्थान आहे. या दृष्टीने कार, रिक्षा व अन्य वाहने जी पर्यटन सफर घडवतील. त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस्साठी येणारे पर्यटक जिल्ह्याची पर्यटन सफर करतील. त्या पर्यटकांसाठी पर्यटनस्थळांची पॅकेज निश्चिती करावी. यासाठी टूर्स व्यावसायिकांना सोबत घेऊन महासंघ काम करणार आहे. आपण सगळे एक आहोत, या भावनेतून एकत्र येऊया, असे आवाहन तोडणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page