श्रीफळ अर्पण करण्यासाठी लोटला महासागर

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनीही दर्शविली उपस्थिती

मालवण दि प्रतिनिधी
वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसातही आज मालवणवासीयांनी सागराला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला. तर भर पावसातही नारळ लढविण्याच्या स्पर्धांमध्ये महिला व पुरुषांनी कमालीचा उत्साह दाखवत आनंद लुटला. या उत्सवास केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजापूरच्या माजी आमदार हुस्नबानू खलीपे यांनी उपस्थिती दर्शवली.

मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर आज साजरा झाला. यावर्षी कोरोनाचे सावट नसल्याने या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र आज मालवणात मुसळधार पाऊस आणि वारे वाहत असतानाही आज ३ वाजता सर्व व्यापारी बांधव बाजारपेठेतील हनुमान मंदिरात एकत्र जमून त्यानंतर वाजतगाजत मिरवणूकीने सर्व व्यापारी बांधव, नागरिक मालवण बंदर जेटी येथे दाखल झाले. यावेळी किनाऱ्यावर वाऱ्यांचा आणि पावसाचा तडाखा जोरदार असतानाही व्यापारी बांधवांच्या वतीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते मानाच्या श्रीफळाचे पूजन करण्यात येऊन किल्ले सिंधुदुर्ग वरून सागरास श्रीफळ अर्पण करण्यात आल्यावर व्यापारी बांधवांच्या वतीने मुसळधार पावसातच सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नाना पारकर, नितीन तायशेटे, बाळू अंधारी, परशुराम पाटकर, अरविंद मोंडकर, हरी खोबरेकर,नितीन वाळके, यतीन खोत, शिल्पा खोत,मंदार ओरोसकर ,सुहास ओरोसकर, राजा शंकरदास, मुकेश बावकर, कुलराज बांदेकर, मंदार केणी, संमेश परब,सेजल परब सुधीर धुरी गणेश प्रभुलीकर आदी व इतर व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

यावर्षी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या सहकार्याने भरड नाका ते बंदर जेटी अशी सुमारे ८० रिक्षांचा समावेश असलेली रिक्षा रॅली काढून रिक्षा व्यावसायिकांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यात रिक्षा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. या रॅलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय यादव व रिक्षा संघटना अध्यक्ष पपू कद्रेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर बंदर जेटी येथे रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने पपू कद्रेकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, शेखर गाड, संतोष लुडबे, सुधीर धुरी, मेघा सावंत, अन्वेषा आचरेकर, पूजा वेरलकर, श्वेता सावंत, आदी व इतर उपस्थित होते.

आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून मालवणात पावसाने आणि वाऱ्याने जोरदार हजेरी लावत पुढील दोन -तीन तास आपला जोर कायम ठेवला. मात्र त्यानंतर बंदर जेटीवर हळूहळू गर्दी झाली. मध्ये मध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नारळ लढविण्याच्या पारंपारीक खेळाला जोर चढला. तर सागराला श्रीफळ अर्पण करण्यासही नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. पावसामुळे शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा स्थगित करण्यात आली. तसेच कबड्डी व आट्यापाट्या स्पर्धाही रद्द करण्यात आली. तर मालवणी संस्कृती व वारसा मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आणि सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धा पावसातच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.

You cannot copy content of this page