Headlines

वेंगुर्ल्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशाल परब यांच्या हस्ते सन्मान…

⚡वेंगुर्ले, ता. १४-: कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्य, मेहनत आणि जिद्द ठेवावी,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य गोस्वामी सर, कोकण शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळेकर, सचिव विवेक तीरोडकर, समीर कुडाळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र परब, युवराज जाधव, रिया केरकर, गौरी माईनकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुख्याध्यापक व प्राचार्यांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
विशाल परब यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

You cannot copy content of this page