Headlines

मालवणात निसर्गशाळा उपक्रमाचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी)

सध्याच्या आधुनिक युगात मुले निसर्गापासून काहीशी दुरावत चालली असताना मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन निसर्गातील विविध गोष्टींची माहिती देण्याच्या दृष्टीने मालवण मधील यूथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित निसर्ग शाळा’ या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावर्षी या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षाला पाणी अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला निसर्गशाळेचे नवीन विद्यार्थी, त्यांचे पालक, माजी विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपणही निसर्गाचाच एक घटक असल्याने त्याचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी निसर्गशाळा हा समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि काळाची गरज असलेला उपक्रम असल्याचे सांगत सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट यांच्यात सामंजस्य करार झाल्यामुळे निसर्ग शाळेला महाविद्यालयाचे संपूर्ण सहकार्य लाभणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निसर्गशाळेच्या शिक्षिका दुर्गा तिघले यांनी निसर्गशाळेची रूपरेषा स्पष्ट करताना पाणथळ जागा, जमिनीचे प्रकार, वनस्पती व बियांची ओळख, पक्षीनिरीक्षण, वन्यजीवांचा अधिवास, कातळ सडा आणि जैवविविधता अशा विविध विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून दिला जात असल्याचे सांगितले. तर निसर्ग शाळेचे शिक्षक स्वप्निल गोसावी यांनीही निसर्गशाळेची अधिक माहिती दिली तसेच विविध प्रश्न विचारत मुलांची निसर्गाबाबत जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयत्न करत अशा प्रश्नांची उत्तरे शोधत निसर्ग समजून घेण्याची प्रक्रिया निसर्ग शाळेत घडवली जाते, असे गोसावी यांनी सांगितले.

यावेळी निसर्ग व वन्यजीव अभ्यासक डॉ. श्रीकृष्ण मगदूम आणि हिमांशू लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध निसर्गभ्रमंती, अभ्यासदौरे आणि उपक्रमांचे निवडक छायाचित्रे पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे दाखविण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कमल बांदकर यांनी करत निसर्गशाळेत सुरक्षित वातावरणात व प्रशिक्षित टीम सदस्यांसोबत मुले निसर्गाचा अभ्यास करतील, अशी ग्वाही पालकांना दिली. शेवटी आभार चारुशीला देऊलकर यांनी मानले.

You cannot copy content of this page