सुरेश भोगटे यांची मागणी: नगरपरिषदेचे वेधले लक्ष..
⚡सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी नगरपरिषदेकडून नागरिकांना स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश बाळकृष्ण भोगटे यांनी केली आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या नगरपरिषदेकडून दहनासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडासाठी सुमारे २,१७० रुपये शुल्क आकारले जाते. पूर्वी ही रक्कम कमी होती; मात्र कालांतराने त्यात वाढ होत गेली असून आता ती गरीब कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा भार ठरत असल्याचे भोगटे यांनी नमूद केले आहे.दहनासाठी लागणाऱ्या जळाऊ लाकडाची व्यापाऱ्यांकडील किंमत अंदाजे ८०० ते ९०० रुपये असताना नगरपरिषद त्यासाठी २,१७० रुपये आकारत असल्याने दुःखाच्या प्रसंगी नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शहरातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, अशा वेळी अंत्यविधीसाठी होणारा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे भरलेल्या करांच्या मोबदल्यात नगरपरिषदेकडून ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
वेंगुर्ला नगरपरिषदेकडून दहनासाठी लागणाऱ्या लाकडावरील शुल्क माफ करण्यात आल्याचे उदाहरण देत, सावंतवाडी नगरपरिषदेनही नागरिकांच्या हिताचा विचार करून तत्सम निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केले आहे.
