मडुऱ्यात मध्यरात्री विद्युत वाहिनी तुटली

चार तारा तुटल्या : विद्युत पुरवठा केला खंडित

⚡बांदा ता.११-: मडुरा-डिगवाडी येथे शनिवारी सायंकाळी विद्युत वाहिनीत तुटल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा विद्युतभारित वाहिनीवर झाड पडून चार तारा तुटल्या. कामावर जाणारे विनोद वालावलकर व दिगंबर सामंत थोडक्यात बचावले. विद्युत वाहिन्या तुटल्यानंतर विद्युत प्रवाह आपोआप खंडित होत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत निरीक्षक सिंधुदुर्ग यांनी मडुरा परिसरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी करावी अशी मागणी मडुरा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर यांनी केली आहे.

मडुरा-डिगवाडी येथील विनोद वालावलकर हे सकाळी नेहमीच्यावेळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडले. पायवाटेवर तुटून पडलेली विद्युत वाहिनी त्यांच्या लगेच निदर्शनास आली. त्यांनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना येथून जाऊ नका असे सांगितल्याने अनर्थ टळला. त्यानंतर विद्युत वाहिन्यावर झाड पडून विद्युत वाहिन्या तुटल्याची खबर प्रकाश वालावलकर यांना त्यांनी दिली. श्री वालावलकर यांनी वीज कर्मचाऱ्यांना तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. वारंवार तुटत असलेल्या विद्युत वाहिन्या एक दिवस जिवावर बेतू शकतात याकडे महावितरणने गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे प्रकाश वालावलकर यांनी सांगितले.

दरम्यान, सात गावांसाठी केवळ तीन विद्युत कर्मचारी असल्याने देखरेख ठेवणे कठीण होत आहे. महावितरणने प्रत्येक गावाला स्वतंत्र वायरमन द्यावा अशी मागणी पूर्वीपासूनच जोर धरत आहे. एकंदरीत सिंधुदुर्ग विद्युत निरीक्षक यांनी मडुरा पंचक्रोशीतील धोकादायक विद्युत वाहिन्या व खांब यांची पाहणी करत वाहिनी तुटल्यानंतर प्रवाह खंडित का होत नाही याचा शोध घ्यावा, अशी मागणी प्रकाश वालावलकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page