मच्छी विक्रेत्यांना मार्केट मध्ये बसवावे;व्यापारी संघाचे नगर पंचायतला निवेदन
देवगड ता.११-:
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत भरणारा देवगड येथील शुक्रवार आठवडा बाजारपेठेचे योग्य नियोजन करण्यात येऊन वाहतुकीची होत असलेली कोंडी दूर करण्यात यावी. तसेच देवगड कॉलेज नाका एसटी स्टँड समोर मासे विक्री करण्याकरता बसणाऱ्या महिलांना मासे विक्री करण्याकरिता मासळीमार्केटमध्ये बसण्यास प्रवृत्त करणे, जेणेकरून या परिसरात उघड्यावर मासे विक्री केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते त्या दुर्गंधीला आळा बसू शकतो. त्याचबरोबर देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, प्रसंगी छोटे मोठे अपघात घडतात ,याचा मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा व व्यापारी पेठेतील स्ट्रीट लाईट व हायमास्ट टॉवर ताबडतोब सुरू करण्यात यावे, आठवडा बाजारात येणाऱ्या महिला वर्गांकरिता सुलभ शौचालय सुविधा निर्माण करण्यात यावी. जेणेकरून महिला वर्गांची होणारी गैरसोय दूर होईल अशा मागणीचे निवेदन देवगड जामसंडे नगरपंचायत चे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्याकडे देवगड शहर जामसंडे शहर व्यापारी वर्गातर्फे देण्यात आले आहे .यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, शामराव पाटील, मकरंद लळीत, दिनेश पटेल, अजित टाककर दयानंद मांगले, प्रणव नलावडे ,विश्वमित्र खडपकर व अन्य व्यापारी बंधू उपस्थित होते. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन व्यापारी शिष्टमंडळाला मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी दिले.
