मालवणात उद्याऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव

मालवण व्यापारी संघातर्फे विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.१०-: शिवकालीन परंपरेनुसार साजरा होणारा मालवणातील नारळी पौर्णिमा उत्सव गुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. गत दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध पाळून साजऱ्या झालेला हा नारळी पौणिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. यानिमित्त मालवण व्यापारी संघामार्फत अर्धशतकी परंपरेप्रमाणे बाजारपेठेतून मिरवणूक काढून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात येणार आहे. या उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केले आहे.

मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव २०२० साली कोरोना महामारीमुळे काही मोजक्या व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. तर गत २०२१ साली कोरोनाचे निर्बंध पाळून नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडला होता. यावर्षी कोरोनाचे सावट नसल्याने व निर्बंधही नसल्याने हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

यानिमित्त दरवर्षीप्रमाणे किल्ले सिंधुदुर्ग वरून सागराला श्रीफळ अर्पण केल्यानंतर मालवण व्यापारी संघातर्फे सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी ३ वाजता मालवण सोमवार पेठेतील श्री देव हनुमान मंदिरात व्यापारी बांधव जमून सर्वकल्याणी साकडे घालणार असून त्यानंतर सवाद्य मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर श्री गणपती मुरलीधर देवालयात आगमन व साकडे, सायं. ३.२५ वा. सवाद्य मिरवणूकीचे बंदर जेटी येथे आगमन होणार असून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते मालवणवासीयांच्या मानाच्या प्रतिकात्मक सुवर्ण श्रीफळाचे व सागरराजाचे पुजन होणार आहे. सायं.३.४५ नंतर किल्ले सिंधुदुर्ग येथील प्रथम मानाचा श्रीफळ अर्पण सोहळा व त्यानंतर मालवणवासीयां कडून सागराला श्रीफळ अर्पणास प्रारंभ होणार आहे.

यानिमित्त सायं.४ वा. आट्यापाट्या या मान्यताप्राप्त खेळाचा बॅ.नाथ पै सेवांगणच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनीय सामना होणार आहे. सायं. ५ वाजल्यापासून निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन व सामने होणार आहेत. तर सायं.५.३० ते ६.३०वा. दैवज्ञ भवन येथे व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव व विविध (अराजकीय) क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी सभासदांचा सत्कार समारंभ होणार आहे. शुक्रवार दि.१२ ऑगस्ट रोजी सायं.४ वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्लास्टीक मुक्ती अभियाना बाबत मालवण नगरपालिका व व्यापारी संघ संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित केले आहे. या ऐतिहासिक उत्सवात व्यापारी संघाच्या सर्व सदस्यानी व तमाम मालवण वासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page