मालवण (प्रतिनिधी)
कणकवली- मसुरे डांगमोडे ही बसफेरी बंद असल्याबाबत डांगमोडे ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी मालवण आगार व्यवस्थापकांकडे निवेदन सादर करत कणकवली- मसुरे डांगमोडे ही बस सेवा पूर्वी प्रमाणे सुरू करण्याची मागणी केल्यानंतर मालवणचे आगारव्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ८ ऑगस्ट पासून ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे मालवणचे आगारव्यवस्थापक बोवलेकर यांनी बससेवा सुरू केल्याबद्दल डांगमोडे ग्रामस्थांनी आगारव्यवस्थापकांचे आभार मानले आहेत.
याबाबत डांगमोडे येथील मोहन धोंडीदास ठाकूर, रमेश मधुसूदन ठाकूर, सुरेश आत्माराम ठाकूर, संजय शिवाजी ठाकूर व अन्य ग्रामस्थ यांनी मालवणचे आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांना निवेदन सादर केले होते. डांगमोडे- मसुरे- मसदे- बागायत- कुणकवळे- कट्टा – सुकळवाड- कसाल मार्गे कणकवली पर्यंत जाणारी मालवण आगाराची बसफेरी गेली ३०- ३५ वर्षे सुरू होती. मात्र अलीकडचय कालावधीत ही बसफेरी बंद होती. यामुळे डांगमोडे मसुरे येथील ग्रामस्थ, विद्यार्थी, किरकोळ व्यापारी यांची गैरसोय होत होती. श्रावण महिना सुरू होऊन येत्या गणेशोत्सवासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रवास करणार आहेत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बस फेरी पुन्हा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली होती.
या मागणीची दखल घेत मालवण आगाराने दि. ८ ऑगस्ट पासून ही बसफेरी पुन्हा सुरू केली आहे. याबाबतची माहिती आगारव्यवस्थापक श्री. बोवलेकर यांनी दिली आहे. ही बसफेरी पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे डांगमोडे ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
