मंत्रीपदानंतर केसरकर प्रथमच १३ ला जिल्ह्यात

सावंतवाडीत घेणार मेळावा:विरोधकांच्या आरोपाला उत्तर देणार का ? याकडे लक्ष

⚡सावंतवाडी ता.१०-: कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर हे पहिल्यांदाच १३ तारीख ला जिल्ह्यात येणार असून, यावेळी ते सायंकाळी ४ वाजता गांधी चौक येथे जाहीर मेळावा घेणार आहेत. यावेळी सावंतवाडीच्या नागरिकांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहेत. यावेळी ते विरोधकांना काय उत्तर देतात हे पाहावे लागेल.

माजी मंत्री कै भाईसाहेब सावंत यांच्यानंतर सुमारे ३० वर्षांनंतर दिपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे.
त्यामुळे केसरकर यांच्या समर्थकांत आनंद आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद निष्ठा यात्रा काढली. सावंतवाडी शहरात या निष्ठा यात्रेत शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत ठाकरे शैलीत रोखठोक विचार मांडले होते. याला सावंतवाडीचे सुपुत्र आमदार दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या दौऱ्यात उत्तर देणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कॅबिनेट मंत्री म्हणून दिपक केसरकर जिल्हा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे केसरकर दि.१३ ते १५ ऑगस्ट पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतील असे सांगण्यात आले.
मंत्री केसरकर शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील. गोवा विमानतळावरून दोडामार्ग तालुक्यात येतील. त्यानंतर सावंतवाडी शहरात येतील. सायंकाळी ४ वाजता गांधी चौकात जाहीर मेळाव्यात उपस्थित राहतील. यावेळी शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेच्या वेळी उपस्थित होते त्यापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल असा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करत उत्तर देणार आहेत.
मंत्री केसरकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शनिवार दि.१३ ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिपकभाई केसरकर प्रथमच येत आहेत त्यामुळे भव्य स्वागत, सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गांधी चौकात जाहीर मेळाव्यात ते बोलतील. यदाकदाचित समजा पाऊस कोसळत असल्यास जाहीर मेळावा वैश्यभवन येथे होईल.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दीपकशेठ मंत्री झाल्याने आनंद व्यक्त करणाऱ्यांची संख्या मोठी आहे असे राजन पोकळे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page