जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सेल्फी पॉइंट

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी कापली फित;सीईओ प्रजित नायर होते उपस्थित

सिंधुदुर्गनगरी ता १०
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद इमारत रंगरंगोटीने नटली आहे. जिल्हा परिषदेच्या एन्ट्री पॉईंटवरील सेल्फ़ी पॉइंट लक्षवेधी ठरला आहे. या सेल्फ़ी पॉइंट चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांअंतर्गत जिल्हा परिषद कार्यालयाच्या एन्ट्री पॉइंटवर व पहिल्या मजल्यावर रंगरंगोटी करून त्यावर उपदेश देणारी तसेच जिल्ह्याची ओळख निर्माण करणारी रेखाचित्रे काढण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दशावतारी कलेचा जणू वारसच लाभलेला आहे. दशावतारी ही कला कोकणातच नाही तर सातासमुद्रापार पोहचली असून जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या एन्ट्री पॉईंटवर (प्रवेश द्वारावर) दशावतारी मुखवट्याच्या स्वरूपात “सिंधुदुर्ग” हे नाव रेखाटण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव अशा अनोख्या लक्षवेधी स्वरूपात काढल्याने जिल्हा परिषदेचा एन्ट्री पॉईंट खास आकर्षण ठरत आहे. तसेच प्रवेश द्वारावरील सेल्फ़ी पॉइंट लक्ष वेधुन घेत आहे. या सेल्फ़ी पॉइंट चे उद्धघाटन आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हापरिषद भवनात होत असलेल्या रंगरंगोटी कामाची पहानी करून , खरोखरच जिल्हा परिषद भवनाचा कायापालट झाला असल्याचे सांगत जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुक केले.

  • घोषवाक्यातून प्रचार प्रसिद्धि

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रंगरंगोटी तसेच भित्तिचित्रे काढण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेला एक वेगळेच रूप आल्याचे दिसून येत आहे. स्वछ गाव सुंदर पाणी हीच जीवनाची खरी पर्वणी, करून सांडपाणी कचऱ्याचे व्यवस्थापन मिळवू हागणदारीमुक्त सन्मान, आता वेळ नाही लपविण्याची आता वेळ आहे ज्ञान मिळविण्याची, जल है तो कल है, स्वछता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजारपण, लिंग समानता, मासिक पाळी मुळे चालते जीवन- दूर करा आपले सगळे भ्रम, गिरवू अक्षर होऊ साक्षर, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, कापडाची पिशवी घरोघरी निसर्गाचे संरक्षण करी, सुंदर आरोग्य सुंदर पृथ्वी, इत्यादी उपदेशपर घोषवाक्यांनी आणि बोलक्या चित्रांनी या भिंती रंगविण्यात आल्या आहेत.

” ओरीगो डिझाईन ग्रुप चे काम कौतुकास्पद ” –

” ओरीगो डिझाईन ग्रुप ला” या चित्र सजावटीचे काम देण्यात आले आहे. या ग्रुपमधील फाईन आर्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुले या भिंतीना बोलक्या बनवत आहेत. त्याच्या कुंचल्यातून उमटलेल्या कलाकृतीचे कौतुक होत आहे. या ग्रुप मधील सर्वच कलाकार आपल्या कलागुणांचा वापर करून सुंदर भित्तिचित्रे काढत आहेत. त्यांच्या रंग कलेचे कौतुक जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page