राणी पार्वतीदेवी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
सावंतवाडी : वन विभाग सावंतवाडीकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त विद्यार्थी व समाजामध्ये निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये सावंतवाडीमधील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या प्रभातफेरीची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद यांच्या हस्ते पालखीमध्ये स्थानापन्न करण्यात आलेल्या रोपांच्या पूजनाने झाली. या पुजनानंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व वनअधिकारी-कर्मचारी यांनी शहरातील मुख्यरस्त्यावरून, गांधी चौक, बाजारपेठ, मिलाग्रीस शाळा ते RPD महाविद्यालया अशी वृक्षदिंडी व जनजागृती फेरी पार पाडली. या रॅलीदरम्यान पर्यावरण जनजागृतीपर व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. यानंतर महाविद्यालयात पालखीमधून वृक्षदिंडी काढून आणलेल्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण व निसर्गसंवर्धन मानवाच्या अस्तित्वासाठी का महत्वाचे आहे ? याचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयीन शिक्षणानंतर वनविभागामध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी याविषयी देखील मार्गदर्शन केले. तसेच सावंतवाडी वनविभागाकडून सर्व विध्यार्थ्यांना माहितीपुस्तक व अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनात वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद सावंत, प्रमोद राणे, अनिल मेस्त्री व राणी पर्वतीदेवी महाविद्यालयाचे शिक्षक श्री. शृंगारे सर व इतर शिक्षकवर्ग तसेच सावंतवाडी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर, प्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, वनपाल-प्रमोद सावंत, प्रमोद राणे, अनिल मेस्त्री, प्रा.प्रविण बांदेकर, श्री. शृंगारे आदी उपस्थित होते.
