थोडक्यात शेतकरी व जनावरे बचावली : प्रकाश वालावलकर यांची माहिती
⚡बांदा ता.०७-: मडुरा डिगवाडी येथे शनिवारी संध्याकाळी विद्युत वाहिनी तुटली. सुदैवाने शेतकऱ्याच्या व जनावरांच्या जिवावर बेतणारी घटना टळली. मात्र याची कल्पना अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांकडून एलटी लाईनसाठी मला फोन करायचा नाही असा निरोप आल्याचे शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी सांगितले. तसेच सदर ठिकाणी जीवित हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवालही शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना करत एकूणच कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
रविवारी सकाळी शेतकरी प्रकाश वालावलकर हे आपल्या जनावरांना घेऊन शेतात जात होते. जाण्या-येण्याच्या मार्गावरच विद्युत वाहिनी तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु काळजी घेतल्यामुळे जीवितहानी टळली. शनिवारी तुटलेली वाहिनी दुसऱ्या दिवशीही तशाच अवस्थेत होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्युत पुरवठाही सुरू होता. गावात वायरमन नसल्याने बांदा कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क न झाल्याने याची कल्पना सावंतवाडी उपविभागीय अभियंता श्री. भुरे यांना दिल्यानंतर लाईनमन श्री. पांढरभिसे यांच्यामार्फत निरोप आला की एलटी लाइनसाठी आपणास कोणीही संपर्क साधू नये. परंतु आम्हा शेतकऱ्यांना विद्युत वाहिनीमधील कुठच्याही लाईन संदर्भात माहिती नसून आम्ही फक्त तुटलेली वाहिनी आहे याची कल्पना अधिकाऱ्यांना देतो ही आमची चूक झाली का असा खडा सवाल प्रकाश वालावलकर यांनी सावंतवाडी उपविभागीय अभियंता यांना करत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच विद्युत वहिनी तुटून यापूर्वीही आमचे नुकसान झाले असून भविष्यात आमच्या व जनावरांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास महावितरण जबाबदार असेल असे श्री. वालावलकर यांनी सांगितले.
दरम्यान, उपविभागीय अभियंता सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
