महामार्ग प्राधिकरण विरोधात नागेश मोरये यांचे पुन्हा कणकवली प्रांत कार्यालयासमोर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

समस्या सोडविण्यासाठी संयुक्त पाहणी केली नसल्याचा आरोप..

⚡कणकवली ता.०४-: महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी नांदगाव येथील भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही . या सर्व मुद्द्यांबाबत २५ जूलैला नागेश मोरये उपोषनाला बसले असताना संयुक्त पाहणी, समस्या सोडविण्याचे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन पूर्तता केली नसल्याने पुन्हा १५ ऑगस्टला आमरण उपोषण करण्याचे पत्र संबंधित विभागाना जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी जि . प . सभापती नागेश मोरये यांनी दिले आहे .

निवेदनात म्हटले आहे , महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या सध्यस्थितीबाबत आम्ही यापूर्वीही तक्रारअर्ज केले आहेत . मात्र अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही . नांदगांव मोरयेवाडी येथे हायवेला पूर्वी सहा पाईप होते . पण , ते रद्द करुन साईडच्या गटाराला जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पाच फुट रस्ता पाण्यात जातो . तेथील काही घरांभोवतीही पाणी साचते . नांदगांव तिठा येथील श्री देव कोळंबा मंदिर ते खानोलकर घरापर्यंत दुतर्फा गटार व्यवस्थित न बांधल्यामुळे , फाऊंडेशन चुकीच्या पध्दतीने वापल्यामुळे , निकृष्ट बांधकाम झाल्यामुळे गटारे तुंबलेली आहेत . नजीकच सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे . पण , संपादित जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत तेथे काम करण्यात येऊ नये . नांदगाव येथील सर्व्हिस रोडची रुंदीही कमी आहे . जोडरस्त्यांची उंची वाढविण्याची व डांबरीकरणाची गरज आहे . हायवेपासून दाट वस्ती असलेल्या भागापर्यंत रस्त्याला दिवाबत्तीची सोय केलेली नाही . ओटव माईण फाटा ओव्हर ब्रिजवरील स्ट्रीट लाईट कायम बंद असते . रस्त्याच्या बाजूला असलेली नळयोजनेची पाईप लाईन गटाराचे बांधकाम करतेवेळी वारंवार खोदून पाईप लाईन नादुरुस्त होत आहे . पुल , मोऱ्या चुकीच्या बांधलेल्या आहेत . त्यामुळे पाणी साचून अनेकांचे नुकसान होत आहे . नळयोजनेची लोखंडी पाईप लाईन चुकीच्या पध्दतीने घातलेली आहे . पाण्याचा प्रवाह उलट दिशेने फिरवल्याने नांदगांव येथील शाळा इमारतीचे नुकसान होत आहे .

शाळेच्या जमिनीचा मोबदलाही मिळालेला नाही . संपादीत जमिनीचा मोबदला केव्हा पाठवला याची माहिती मिळावी व चुकीचे काम करणारे अधिकारी , ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी . चुकीने केलेल्या कामाबाबत कंत्राटदार व शाखा अभियंत्यावर कडक कारवाई व्हावी . ओटव माईण ब्रीजवरून येणारे पाणी शाळा शाळेच्या इमारतीत घुसत आहे . गटारे पक्की नसल्याने देव कोळंबा परिसरात व बाजूच्या शेतात पाणी घुसत आहे . काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता आहे . नांदगांव येथील ओव्हरब्रीजचे काम चुकीच्या पध्दतीने केल्यामुळे नविन हायवेची जागा शिल्लक राहिली . त्यामुळे आता नव्याने संपादन करावे लागते . कार्यकारी अभियंता श्री . ओटवणेकर यांच्या मनमानी कारभारामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी . नांदगाव तिठा ब्रिज ते बेळणे हद्दीपर्यंत हायवेच्या मध्यापासून किती मीटर जागा संपादित केली , सर्व्हिस रोडसाठी किती जागा संपादीत केली याची लेखी माहिती मिळावी .

सर्व्हिस रस्ते व्यवस्थित केलेले नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे . नांदगांव हायवे तिठ्यावर जागा उपलब्ध नसल्यामुळे रिक्षावाले कोठेही रिक्षा लावत असतात . त्यांना रिक्षा स्थानक उपलब्ध करून देण्यात यावे . चुकीच्या मार्गाने स्टॉल उभारले असतील तर ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत . नांदगांव तिठ्यावर अंडरपाईप टाकल्याने पाणी निचरा होणे कठीण झालेले आहे . नांदगाव शाळा नं १ समोर झेब्रा लाईन व डांबरीकरण त्वरीत करावे . यापूर्वी नांदगांव सरपंच यांनी समस्यांबाबतचे पत्र पाठवले होते . पण , याबाबत योग्य स्पष्टीकरणही मिळालेले नाही . पूर्वी जे नाले वंशपरंपरेने वाहत होते त्या ठिकाणी चर काढून दुसऱ्या नाल्याला जोडल्यामुळे प्रवाह बदलून इतर ठिकाणी पाणी सोडलेले आहे . त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे . वरील मुद्याबाबत लेखी आश्वासन उपोषणाला बसलो तेव्हा देऊनही महामार्ग प्राधिकरणने दुर्लक्ष केल्याने उपोषण छेडणार असल्याचे नागेश मोरये यांनी निवेदनात म्हटले आहे .

You cannot copy content of this page