⚡बांदा ता.२८-: सावंतवाडी तालुक्यातील दांडेली-फणसमाडे नदीवरील मोडकळीस आलेल्या पादचारी पुलाचे संरक्षक पाइप तुटून पूल धोकादायक बनले होते. दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर यांनी दखल घेत उपसरपंच दिनेश माणगावकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतः पुलाच्या बाजूचे लोखंडी संरक्षक पाईप वेल्डिंग केले. तसेच भौगोलिक परिस्थितीची पाहणी करत याठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दांडेली फणसमाडे पुलाला बसला. अगोदरच जीर्ण व मोडकळीस आलेल्या पुलाचे संरक्षक पाइप तुटून पडले. त्यामुळे ग्रामस्थांना बाजारपेठ, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच अन्य कामांसाठी मुख्य मार्गावर ये-जा करणे धोक्याचे बनले होते. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सरपंच कृष्णा पालयेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पुलाच्या तुटलेल्या भागाला वेल्डिंग करत सद्यस्थितीत तात्पुरता पादचारी मार्ग निर्धोक केला. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
