⚡कणकवली ता.२७-: राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी कार्यवाही करावी यासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे कणकवलीत तहसीलदार, पोलीस ठाणे, कणकवली कॉलेज, गटशिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत केंद्र शासनानेही ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे.
यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली म्हणून केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. यात १३ ते १५ आगॅस्ट २०२२ या कालावधीत भारतभर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. ही एक आनंदाची बाब आहे; मात्र हे करतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचीही दक्षता सर्व राष्ट्रप्रेमींनी घेतली पाहिजे. तशा सूचना सर्वांना दिल्या पाहिजेत. गेल्या दोन वर्षांपासून दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या ‘मास्क’ची विक्री होत आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार
अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०, कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ ‘ चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० या कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या १९ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवते. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके – फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर जागृतीपर ध्वनीचित्रफित दाखवणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, ‘सोशल मीडीया’द्वारे जनजागृती करणे आदी कृती केल्या जातात. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असेल, वा राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्यास प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे असे निवेदनात म्हटले आहे.
