Headlines

वीज समस्येवरून महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव…

ओटवणे, चराठा, सोनुर्ली, तळवडे व कोलगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक..

सावंतवाडी : वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या ओटवणे, चराठा, सोनुर्ली, तळवडे, कोलगाव भागातील ग्रामस्थांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना चांगलेच धारेवर धरले. लेखी आश्वासन द्या, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करा. अन्यथा, नवीन रिडींग घ्यायला गावात फिरू देखील देणार नाही, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.

बरेच दिवस ग्रामीण भागात लाईट नसल्याने महावितरणच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. उप कार्यकारी व ग्रामीण विभागाच्या अभियंतांनी त्यांनी घेराव घातला. पावसाळा येण्यापूर्वी झाडी मारण्याचं काम कुणाचं होत ? मग, आज ही वेळ का आलीय ? असे सवाल करत उपस्थितांनी जाब विचारला. तसेच स्मार्ट मीटर वेत्ये गावात बसवू दिले नाहीत तसेच जर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर रिडींग देखील घेऊ देणार नाही. गावात आलात तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा उबाठा शिवसेनेचे सुनिल गावडे यांनी दिला. तर, युवा सैनिक क्लेटस फर्नांडिस, राकेश पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत लेखी आश्वासन देण्यास सांगितले. महिला वायरमन गावात असून त्या पोलवर चढणार का ? असाही सवाल केला. ग्रामस्थांचा अंत पाहू नका. अन्यथा, चोप देऊ असा इशाराही दिला. तसेच आमदार, खासदार, मंत्री केवळ निवडणुकीत येतात. मात्र, आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत अशी खंत गुंडू जाधव यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एप्रिल पासून तुम्ही केलत काय ? काम जमत नसतील तर बोजाबिस्तर गुंडाळून घरी जा असा इशारा त्यांनी दिला.‌ तर अधिकारी केवळ ठेकेदाराकडून मलिदा लाटण्यात व्यस्त असल्याचा आरोप श्री. गावडे यांनी केला. यावेळी चराठा सरपंच प्रचिती कुबल, राजू कुबल, शब्बीर मणियार आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनाही शॉक !
ओटवणे ग्रामस्थांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत उप कार्यकारी अभियंतांनी गावात येऊन पाहणी करावी अशी मागणी केली. तसेच अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्यासाठी दुसऱ्या मिनिटाला हजर असणारे पोलिस चोरी झाली की लेट का येतात ? असाही सवाल राजन म्हापसेकर यांनी केला.

You cannot copy content of this page