बबन साळगावकर:योजनेची सर्वंकष व निष्पक्ष चौकशी करून कामातील त्रुटी समोर आणाव्यात..
⚡सावंतवाडी, ता. ७-; सावंतवाडी शहरासाठी राबविण्यात आलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या चौकशीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले आहे. या योजनेची सर्वंकष व निष्पक्ष चौकशी करून कामातील त्रुटी समोर आणाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला दीर्घकाळ शाश्वत पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नाशिक येथील कंपनीकडून तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात काम अत्यंत संथ व निष्काळजीपणे करण्यात आले. योजनेच्या कामावर मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक असताना तसे झाले नाही, असा आरोप त्यांनी केला.
योजनेच्या देखरेखीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराच्या कामात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये किंवा सूचना देऊ नयेत, असे आदेश देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले.
या योजनेत वापरण्यात आलेल्या पाईपची गुणवत्ता व जाडी (थिकनेस), पाईपलाईन किती खोलीवर टाकण्यात आली, त्यासाठी आवश्यक वाळू, ग्रीड, ग्रॅव्हेल व दगडांचा वापर करण्यात आला का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कंट्रोल व्हॉल्व्ह, धरण परिसरातील संपवेल, फिल्टरेशन प्लांट, जुनी व नवी ग्रॅव्हिटी व्यवस्था यांचीही तांत्रिक तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकल्पाचे थर्ड पार्टी ऑडिट करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करत पालकमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे आपण स्वागत करत असल्याचे बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.
