Headlines

“जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर खुर्ची खाली करा”..

रुपेश राऊळ महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक:समस्या तातडीने मार्गी न लावल्यास जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल..

⚡सावंतवाडी, ता. ७-: तालुक्यात अनेक गावांमध्ये चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर खुर्ची खाली करा,” असा आक्रमक इशारा दिला.

राऊळ म्हणाले, “गावागावात चार-चार दिवस वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवावे. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आम्हीही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, मात्र नागरिकांना वेठीस धरू नका.”आज “निकृष्ट दर्जाचे वीज खांब उभारल्यामुळे ते उखडून पडत आहेत. अशा कामांमध्ये झालेल्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
वीजपुरवठ्याची समस्या तातडीने मार्गी न लावल्यास जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल, असा इशाराही रुपेश राऊळ यांनी महावितरण प्रशासनाला दिला.

You cannot copy content of this page