Headlines

बांदा–दाणोली मार्गावरील धोकादायक खड्ड्याची तात्पुरती दुरुस्ती…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी…

⚡बांदा ता.०७-: बांदा–दाणोली मार्गावरील बांदा निमजगा येथील लक्ष्मी विष्णू अपार्टमेंटसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. संबंधित यंत्रणेकडून तातडीने दुरुस्ती न झाल्याने अखेर सामाजिक बांधिलकी जपत काही युवकांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवून आदर्श निर्माण केला.
या मार्गावर आंबोली व गोवा येथे जाणाऱ्या वाहनांची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पावसामुळे रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा पाण्याखाली जात असल्याने त्याचा अंदाज वाहनचालकांना येत नव्हता. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अनेक नागरिकांनी या समस्येबाबत चिंता व्यक्त केली होती.
याची दखल घेत राजन डेगवेकर, प्रशांत गवस आणि बाळाजी राणे यांनी स्वतः दगड व खडी टाकून खड्डा तात्पुरता बुजविला. त्यांच्या या कार्यामुळे रस्त्यावरील धोका काही प्रमाणात कमी झाला असून वाहनचालकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी या युवकांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केले आहे. दरम्यान, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. युवकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका संभाव्य मोठ्या अपघाताला आळा बसला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

You cannot copy content of this page