Headlines

अधिकृत आदेशाशिवाय देवगड अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याचे समजू नका…

पालकमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत;परशुराम उपरकर

⚡कणकवली ता.०७-: देवगड येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली असली, तरी प्रकल्प रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडून अधिकृत आदेश निघाल्याशिवाय हा प्रकल्प रद्द झाला, असे जनतेने समजू नये. पालकमंत्री केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, देवगड येथे एक लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचबरोबर उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाबाबत करारही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी अधिकृत आदेशाद्वारेच जाहीर करणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी केवळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करू नये. त्यांनी मुख्यमंत्री यांना प्रकल्प रद्द करण्यासाठी पत्र दिले असेल, तर ते पत्र जनतेसमोर जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जोपर्यंत शासनाकडून अधिकृत आदेश निघत नाही, तोपर्यंत नागरिकांनी प्रकल्प रद्द झाल्याचा समज करून घेऊ नये, असे आवाहन करत त्यांनी गावागावांत ग्रामपंचायतींचे ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याची गरज व्यक्त केली. बाहेरील व्यक्ती अथवा दलालांना जमीन विकू नये. नाणारप्रमाणे येथेही आधी जमिनी खरेदी करून नंतर प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावा श्री. उपरकर यांनी केला.

यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कामकाजावरही टीका केली. देवगडमधील पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही देवगडमध्ये अद्याप आधुनिक मच्छी मार्केट उभारण्यात आलेले नाही. घनकचरा व्यवस्थापनाचीही प्रभावी व्यवस्था उपलब्ध नाही, असे ते म्हणाले.

देवगडमधील वॅक्स म्युझियम बंद पडले असून संबंधित इमारत मालकाचे भाडेही अद्याप थकीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पर्यटन सुविधा केंद्रांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना कणकवली, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील अशी केंद्रे बंद अवस्थेत असल्याचे त्यांनी नमूद केले. डीपीडीसी निधीचा वापर दिखाऊ प्रकल्पांऐवजी आरोग्य सेवा आणि मूलभूत सुविधांसाठी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

देवगडमध्ये नुकतीच काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली ही रोजगाराच्या मागणीसाठी होती. या रॅलीत सत्ताधारी पक्षाशी संबंधित अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावरूनच स्थानिक तरुणांना गेल्या अनेक वर्षांत रोजगार मिळालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

अणुऊर्जा प्रकल्प रद्द होईपर्यंत जनतेने आपला लढा कायम ठेवावा. गावागावांत प्रकल्पविरोधी ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावेत. शिवसेना जनतेच्या या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहील, असा विश्वासही श्री. उपरकर यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page