Headlines

वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला दांडी परिसरातील वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत…

सभापती अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा;महावितरणच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक..

⚡मालवण,ता.०६-:
रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मालवण परिसरात आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. या दुर्घटनेत विजेचा खांब कोसळल्याने हिंदळेकरवाडी, गर्दे रोड आणि दांडी परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांना जवळपास २४ तास अंधारात राहावे लागले. या घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला. त्यांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला.

दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. प्रतीक्षा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर अथक परिश्रम घेतले. या कामासाठी महावितरणचे अधिकारी सचिन मेहेत्रे व श्री. मयेकर यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक नागरिक शैलेश मयेकर आणि चंद्रकांत मयेकर यांनीही प्रत्यक्ष कामात मोलाचे सहकार्य केले.

या सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अवघ्या २४ तासांच्या आत आज सायंकाळी सहा वाजता हिंदळेकरवाडी, गर्दे रोड आणि दांडी परिसरातील वीजपुरवठा यशस्वीपणे सुरळीत करण्यात आला.

वादळासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कार्यवाही करून वीजपुरवठा पूर्ववत केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी सभापती अन्वेषा आचरेकर, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page