वीज ग्राहकांच्या समस्यांवर ९ जुलैला शाखानिहाय बैठका..
⚡दोडामार्ग ता.०७-: वीज ग्राहक संघटना दोडामार्गच्या वतीने सोमवारी दोडामार्ग महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाने वीज ग्राहकांच्या विविध समस्यांची दखल घेतली आहे. आंदोलनादरम्यान तालुक्यातील वीजविषयक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी शाखानिहाय बैठका आयोजित करण्याची मागणी संघटनेचे सचिव भूषण सावंत यांनी केली होती.
या मागणीची दखल घेत दोडामार्गचे प्रभारी अभियंता पराग श्रीधरनकर यांनी लेखी आश्वासन दिले असून त्यानुसार गुरुवार, दि. ९ जुलै रोजी तालुक्यात तीन ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी १० वाजता कळणे शाखेची बैठक सासोली उपकेंद्र येथे, दुपारी १२ वाजता दोडामार्ग वीज कार्यालयात तसेच सायंकाळी ४ वाजता साटेली-भेडशी कार्यालयात बैठक होणार आहे.
या बैठकींना जिल्हा अभियंता वनमारे उपस्थित राहून वीज ग्राहकांच्या तक्रारी, समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. त्यामुळे वीज पुरवठा, कमी दाब, वारंवार खंडित होणारी वीज सेवा तसेच इतर समस्यांनी त्रस्त असलेल्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन वीज ग्राहक संघटना दोडामार्गचे सचिव भूषण सावंत यांनी केले आहे.
