प्लास्टिक मुक्तीबाबत जागृती करणाऱ्या ‘इकोब्रिक्स’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१९-: शासनाने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणल्यानंतर नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण- इकोब्रिक्स स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग लाभला. या स्पर्धेत एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग दर्शवित प्लास्टिक कचऱ्याने भरलेल्या २५०० बॉटल्स म्हणजेच इकोब्रिक्स जमा केले. या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास ५०० किलो प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर नगरपालिकेकडून केला जाणार आहे. इकोब्रिक्सचा वापर बगीचा सुशोभिकरणासाठी केला जाणार आहे.

पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिक मुक्ती बाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून इकोब्रिक्स या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांची प्लास्टिक आवरणे यासह इतर प्लास्टिक जन्य कचरा प्लास्टिक बॉटल मध्ये भरून त्या बॉटल म्हणजेच ब्रिक्स नगरपालिकेकडे जमा करावयाचे होते. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्याबरोबरच शिक्षक, पत्रकार, शहरातील सेवाभावी संस्था ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी आदीनी सहभाग दर्शविला. दि. १५ ऑगस्ट रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत दांडी येथील मच्छीमारांनी पावसाच्या पाण्याबरोबर समुद्रात वाहून येणारी शीतपेयांच्या प्लास्टिक बाटल्यांची जवळपास हजार झाकणे तसेच प्लास्टिक चमचे, स्ट्रॉ हे देखील गोळा करून करून ती इकोब्रिक्स म्हणून सादर केली आहेत. शहरातील शाळांमधील विद्यार्थी व पालकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी शहर समन्वयक निखील नाईक, लिपिक महेश परब, मंदार केळुसकर, स्वच्छता निरीक्षक प्रसाद भुते, राजा केरीपाळे, आनंद वळंजू, स्वच्छता कर्मचारी सुमित हसोळकर व सुमेध जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page