मुसळधार पावसामुळे झाडी आणि विज वाहिन्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प…

वैभववाडी संजय शेळके
तालुक्याला बुधवारीही मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एडगांव पुलानजीक रस्त्यावर वीज वाहीण्यांसह झाड पडल्यामुळे वैभववाडी- गगनबावडा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एस.टी. मार्गस्थ झाल्यानंतर काही क्षणात झाड कोसळले. पोलिसांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.


तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. मंगळवारी सायंकाळपासून तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. बुधवारी देखील तालुक्याला पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच दुपारी १२.४५ वा. सुमारास एडगाव पुलानजीक आकेशियाचे झाड जवळच असलेल्या वीज वाहीण्यांसह रस्त्यावर पडले.
त्याच दरम्यान कणकवली मौंदे ही एस.टी.बस मौंदेकडे जात होती. झाड एसटी वरतीच पडणार होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. बुधवार वैभववाडीचा आठवडे बाजार असल्यामुळे प्रवाशांसह विदयार्थ्यांनी एस.टी.बस भरलेली होती. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. अपघाताची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस राहूल पवार, नारनवर, विलास राठोड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने कटर मशिनच्या सहाय्याने पडलेले झाड कापून मार्ग वाहतूकीस मोकळा केला. तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून नदीनाले दुथडी भरुन वाहात आहेत. तर सायंकाळी उशीरापर्यंत करुळ व भुईबावडा घाटातून वाहातूक सुरळीत सुरु होती. दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामाला चांगलाच वेग आला असून बळीराजा सुखावला आहे.
तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे पडून बळी जाण्याची वाट संबंधित विभाग पहात आहे का ? असा संतप्त सवाल प्रवाशी व वाहनचालकांकडून केला जात आहे.
फोटो एस टी बस समोर पडलेले झाड बाजूला हटवताना छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page