पर्यटनात पडली भर: आ नाईक यांची संकल्पना;मयेकर कुटुंबाची कलाकृती
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहर व बंदर जेटी सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध केलेल्या निधीतून मालवणच्या नवीन बंदर जेटीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे १२ पुतळे बसविण्यात आले आहेत. हे पुतळे मालवणचे सुपुत्र गणेश मयेकर यांच्या स्कल्प कंपनी व शिल्पकार प्रशांत मयेकर यांनी साकारले आहेत. जेटीच्या समोरच ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग आणि जेटीवरील मावळे यामुळे एक ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले असून हे पुतळे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत. तसेच येत्या काळात मालवणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात सेल्फी पॉईंट देखील निर्माण करण्यात येणार आहेत.
पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या या शहराचा विकास करत असताना शहर सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने मालवण बंदर जेटी आणि शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण साठी निधी मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या कडे मागणी केली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन मधून ६३ लाख पर्यटन निधी मंजूर करून दिला होता. मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला असून मालवण बंदर जेट्टी येथून या किल्ल्यावर होडीने जावे लागते. त्यामूळे जेटीवर आल्यावर एका ऐतिहासिक वास्तूकडे जात असल्याची भावना निर्माण व्हावी, त्याच प्रमाणे ऐतिहासीक वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीने मावळ्यांचे फायबर पुतळे बसवण्याचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या संकल्पनेतून ठरविण्यात आले होते.त्यांनी व मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पुढाकार घेतला आहे त्यामूळे या विविध सुशोभीकरण कामांपैकी नवीन बंदर जेटी येथे मावळ्यांचे पुतळे बसवून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. लवकरच उर्वरित सुशोभीकरणाची कामे पूर्ण होणार असून त्यांचा लोकार्पण सोहळा आम. नाईक यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे.
मालवण बंदर जेटी येथे मावळ्यांचे १२ पुतळे तर रॉक गार्डन येथे २ पुतळे बसविण्यात आले आहेत. हे पुतळे फायबर पासून बनविलेले आहेत. पुतळे बसविण्याचे हे काम मालवणचे सुपुत्र आणि श्याम सारंग यांचे भाचे गणेश प्रशांत मयेकर यांच्या ‘स्कलप्ट’ या कंपनीने घेतले आहे. तर मावळ्यांचे पुतळे प्रसिद्ध शिल्पकार प्रशांत चंद्रकांत मयेकर यांनी बनविल्या आहेत. या पुतळ्यांबरोबरच मालवण शहरात काही ठिकाणी सेल्फी पॉईंट तसेच जाळी टाकणाऱ्या मच्छीमाराची ३० फूट उंचीची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे. तर शहरात पाच ठिकाणी वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी शिल्पेही साकारण्यात येणार आहेत.
मालवणचे सुपुत्र असणाऱ्या गणेश मयेकर यांच्या कंपनीने कोल्हापूर मधील कागल येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत बसवेश्वर अशा राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे उभारले आहेत. याबद्दल मयेकर यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, नाना पाटेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. यार मयेकर यांनी राधानगरी येथेही छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारला असून याबद्दल तत्कालीन उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत व शाहू महाराज यांच्या हस्ते मयेकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
