रोटेरियन हे मानवतेचे स्वयंसेवक- नसीरभाई बोरसादवाला

⚡मालवण ता.१०-:
रोटरी क्लब ही मानवहितासाठी कार्यरत असणारी संस्था आहे. यातील प्रत्येक रोटेरियन हा आव्हान स्वीकारुन समाज मजबूत करण्यासाठी काम करत असतो. रोटरीचे कार्य चिरंतन असून प्रत्येक सदस्य हा आयुष्यभर रोटेरियन असतो. रोटरीच्या माध्यमातून काम करणारे रोटेरियन हे मानवतेचे स्वयंसेवक आहेत असे प्रतिपादन रोटरी क्लबचे डिजीई नसीरभाई बोरसादवाला यांनी येथे बोलताना केले.

रोटरी क्लब ऑफ मालवणच्या २०२२ – २३ या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या नव्या संचालक मंडळाचा पद्ग्रहण सोहळा रोटरीचे डिजीई (३१७०) नसीरभाई बोरसादवाला यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सॅफरॉन येथे संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. बोरसादवाला हे बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष रतन पांगे, सचिव अभय कदम, खजिनदार रमाकांत वाक्कर व नूतन कार्यकारिणी सदस्यांना श्री. बोरसादवाला यांच्या हस्ते पदभार सोपविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मावळते अध्यक्ष उमेश सांगोडकर, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, गव्हर्नर एरिया एड प्रणय तेली, रमाकांत वाक्कर, सकिना बोरसादवाला आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अजित लिमये, अनिल देसाई, अजय जोशी, सौ. सुविधा तिनईकर यांनी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. तर गतवर्षीचे सचिव म्हणून रतन पांगे यांनी वर्षभरात रोटरीने राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला. तर मावळते अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

यावेळी डिजीई बोरसादवाला यांनी मालवण रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करताना समाजातील गरजा व अडचणी लक्षात घेऊन उपक्रमांमध्ये नाविन्यता आणावी, असे आवाहन केले. तसेच सध्या पर्यावरण संवर्धनाचा, प्लास्टिक कचऱ्याचा मोठा प्रश्न समाजासमोर उभा असल्याने बोरसाडवाला प्लास्टिक विघटन मशीन मालवण सारख्या पर्यटन नगरीत बसविण्यासाठी आपण प्रयत्न करू, तसेच थॅलेसेमिया आजारासाठी रक्त सेंटर, वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी मेंटल हेल्थ कौन्सलिंग सेंटर, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पाणी टंचाई या विषयी विविध उपक्रम राबविण्याचा मानस बोरसादवाला यांनी व्यक्त करत यासाठी सर्व रोटरी क्लबनी सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी नीता गोवेकर, दीपक बेलवलकर, प्रणय तेली यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी नूतन अध्यक्ष रतन पांगे यांनी रोटरी क्लब मार्फत नवनवीन उपक्रम राबवून समाजहितासाठी आपण करू, तसेच यासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी नवीन सदस्यांना क्लब मध्ये सामावून घेण्यात आले. तर सदस्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरीश काजरेकर, सुप्रिया दळवी, सौ. ज्योती तोरसकर, कु. मेगल डिसोझा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी क्लब मालवणच्या दर्पण या वार्षिकाकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सुत्रसंचालन प्रसन्न मयेकर यांनी केले तर आभार अभय कदम यांनी मानले. यावेळी रोटेरियन भाऊ साळगावकर, महादेव पाटकर, बाळू तारी, मेघनाद धुरी, महेश काळसेकर, विनय गावकर, सुहास ओरसकर,उमेश हळदणकर, गणेश नेरकर, संजय गावडे, प्रदीप जोशी, ऋषी पेणकर, ऍड. हेमेंद्र गोवेकर, अमेय पारकर, चाचा हडकर यांसह सावंतवाडी, कुडाळ, शिरोडा, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, सिंधुदुर्ग सेंट्रल, वैभववाडी, बांदा, दोडामार्ग येथील रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page